नेत्रदान व देहदान करा – अण्णा शिरगावकरांचे सक्रीय आवाहन!

“एक सामाजिक बांधीलकी म्हणून अनावश्यक रुढी परंपरा मोडून टाका. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन हजारो अंधांच्या जिवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदान करा तर समाजाला चांगले डॉक्टर मिळवून देण्यासाठी व मृत्यूनंतरसुद्धा समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी देहदान करा” असे आवाहन कोकणचे इतिहास तज्ञ व सागरपुत्र संस्थेचे संस्थापक श्री. अण्णा शिरगावकर यांनी केले आहे. त्यांनी स्वतःचे नेत्रदान व देहदान संकल्प पत्र सहयाद्री निसर्ग मित्र संस्थेकडे सुपूर्त करतेवेळी सदर आवाहन केले आहे.

कोकणला प्राचीन इतिहासanna नाही हे शासकीय तज्ञांचे म्हणणे आपल्या अविश्रांत मेहनतीने खोडून काढत कोकणविषयक स्वाभिमान जागवून, कोकणच्या इतिहासाला कलाटणी देण्याचे काम ज्या व्यक्ती कडून घडले ते म्हणजे श्री. अण्णा शिरगावकर! वडिलोपार्जित अगर इतिहासाविषयी शैक्षणीक असा कोणताही वारसा नसताना केवळ आपल्या अभ्यासू वृत्तीने अण्णा कोकणच्या इतिहास संशोधन माध्यमातून जगभर पोहचले. कसल्याही लाभाची अपेक्षा न करता अण्णा शिरगावकरांनी खूप मोठे समाजकार्य केले आहे. त्यांनी उभी केलेली सागरपुत्र संस्था शेकडो कष्टकरी कुटंबातील मुलांच्या भविष्याचा आधार आहे.
अशा या अण्णांनी सह्याद्री निसर्ग मित्र कडे देहदान, नेत्रदान संकल्प पत्र भरुन एक सामाजिक आदर्श घालून दिला आहे. अण्णा हे एक विज्ञानवादी इतिहासतज्ञ आहेत. त्यांचा अनावश्यक रूढींना नेहमीच विरोध असतो, नुसता विरोधच नाही तर ते प्रत्यक्ष कृतीतून ही दाखवुन देतात. त्यांनी त्यांच्या पत्नी कै. सौ. नंदिनी शिरगावकर यांच्या मृत्युपश्चात मुलींच्या हस्ते अग्निसंस्कार केले तर उत्तरकार्यावर भरमसाठ खर्च करण्याऎवजी त्यांनी अपंगासाठी काम करणार्‍या संस्था, मुलींचे वसतीगृह अशा सामाजिक कार्याला मदत केली. अण्णांनी त्यांचे जीवन सत्कारणी तर लावलेच त्याच प्रमाणे मृत्यूपश्चात देहही सत्कारणी लागावा या हेतुने त्यांनी देहदान आणि नेत्रदान नोंदणी केली आहे.
वैद्यकीय शास्त्राच्या प्रगती साठी व वैद्यकीय महविद्यालयात अध्यायन करणार्‍या विद्यार्थ्यांकरिता मानवी शरीररचनेचा अभ्यास आवश्यक असतो. एका वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वसाधारण पणे वर्षाला ३०-४० देह अभ्यासासाठी आवश्यक असतात. देह्दात्यांमार्फत दरवर्षी अंदाजे २५ ते ३० देह उपलब्ध होतात परंतू ते पुरेसे ठरत नाहीत. देहदानाबद्दल जनजागृती होणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी चिपळूणमधील सगळ्यांच्या परिचयाची संस्था सह्याद्री निसर्ग मित्र “बि. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय”, डेरवण यांच्या सह्योगाने देहदानाचे काम करित आहे तर, “दृष्टिदान आय बॅंक”, सांगली यांच्या सहयोगाने दृष्टीदानाचे काम करत आहे. डेरवण येथील हे महाविद्यालय कोकणातील पहिले अद्ययावत १०० जागांचे महाविद्यालय आहे. मरणोत्तर आपला देह सत्कारणी लागावा या हेतूने जास्तीत जास्त लोकांनी आपले देहदानाचे संकल्प पत्र भरावे असे प्रयत्न सह्याद्रीतर्फे विविध जनजागृती कार्यक्रमातून केले जात आहेत.
नेत्रदान म्हणजे मृत्युनंतर माणसाच्या डोळ्यातील कॉर्नीया काढुन तो अंध व्यक्तीला बसवणे. जगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तींपैकी २० टक्के म्हणजेच ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील एक लाख पन्नास हजार नेत्रदाना अभावी अंध आहेत. त्या मध्ये दरवर्षी ४० ते ५० हजारांची भर पडत असते. प्रतिवर्षी फ़क्त ५० हजार नेत्रदान होते तर दिड लाख कॉर्नीयाची भारताला गरज आहे. या अधांना जर नेत्रदानापासून कॉर्निया उपलब्ध झाले तर त्यांच्या जिवनातील अंध:कार दूर होउ शकेल. अण्णांनी केलेल्या आवाहनाला प्रतीसाद म्हणून मोठ्या प्रमाणात नेत्रदान व देहदान करणे गरजेचे आहे.

सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेव्दारे हे काम अगदी नि:शुल्क चालु आहे. मृत्यू नंतर १ तासात फक्त फोन करुन कळवल्यास पुढील सर्व व्यवस्था संस्थातर्फे केली जाईल.
२४ तास संपर्क – भाऊ काटदरे – ९३७३६१०८१७ उदय पंडित ९८८१५७५०३३ आजच आपला देहदान, नेत्रदानाचा अर्ज भरा. अर्ज भरण्यासाठी संस्थेचा पत्ता:- सह्याद्री निसर्ग मित्र, ११,युनायटेड पार्क, मार्कंडी, चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५ ६०५. फोन नं. ०२३५५-२५३०३०
www.netradaan.org, sahyadricpn@gmail.com